हिमांशू
डोळे आणि दृष्टी यात काय फरक आहे? डोळे असणाऱ्याला दृष्टी असतेच असं नाही आणि डोळे नसणाऱ्यालाही दृष्टी असू शकते. उघड्या डोळ्यांनी आपण आजवर अनेक गोष्टी फक्त पाहत आलो. त्या जाणवत नव्हत्या; फक्त दिसत होत्या किंवा दिसूनसुद्धा “दृष्टीआडची सृष्टी’ ठरत होत्या. पण आज लॉकडाउनने आपल्याला केवळ दृष्टीच नव्हे तर दिव्यदृष्टी दिलीय.
अंगणातल्या किंवा बाल्कनीतल्या पाखरांचा किलबिलाट आपण ऐकून न ऐकल्यासारखा केला होता, तो आता लक्षपूर्वक ऐकू लागलो आहोत. फुलझाडांवर बागडणारी फुलपाखरं केवळ आपल्या डोळ्यातच नव्हे तर मोबाइलच्या कॅमेऱ्यात उतरू लागली आहेत. सतत दिसूनसुद्धा नजरेआड केला जाणारा असाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे पोलीस. आज जेव्हा रस्त्यावर पोलिसांखेरीज अन्य कुणीच नाही, तेव्हा तो आपल्याला ठसठशीतपणे दिसू लागलाय. केवळ वर्दीनिशी नव्हे, तर कामानिशी! एरवी पांढऱ्या वर्दीतला ट्रॅफिक पोलीस पाहिल्यावर गाडीची सगळीच कागदपत्रं जवळ नाहीत, याची जाणीव होऊन आपण धास्तावतो तर खाकी वर्दीतल्या पोलिसाकडे तर दिसूनसुद्धा कानाडोळा करण्याची आपली प्रवृत्ती असते. पोलिसांविषयी बोलतानासुद्धा बहुतेकांच्या तोंडून नकारात्मक सूरच अधिक आळवले जातात. गुन्हेगारीचा आवळत चाललेला विळखा आणि हतबल पोलीस यंत्रणा हा तर उगाळून उगाळून चर्चिला जाणारा विषय. आज या वर्दीतला माणूस आपल्याला दिसू लागलाय; कारण त्याच्यामुळेच आपण कुटुंबियांसमवेत घरात सुखरूप आहोत.
कायदा-सुव्यवस्था राखणं, व्हीआयपींना संरक्षण देणं, कोर्टात चकरा मारणं, मोठ्या कार्यक्रमांच्या बंदोबस्तासाठी धावणं, सापळे रचून गुन्हेगार पकडणं, गुन्ह्यांचा तपास करून पुरावे गोळा करणं, एखाद्या गुन्ह्यातली टोळी पकडली तर त्यांच्या तपासातून इतर अनेक गुन्हे उजेडात आणणं, अपघाताची खबर मिळताच घटनास्थळी पोहोचणं, वाहतुकीला शिस्त लावणं, दंडाच्या पावत्या फाडणं या नियमित कामांच्या पलीकडचं काम आज पोलीस करतायत. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना त्यांनी दंडुक्यांचा प्रसाद दिला किंवा उठाबशा काढायला लावल्या, तरी आपल्याला काही गैर वाटत नाहीये. कारण आपण जाणतो, की आपल्याला घरात ठेवणं हेच पोलिसांचं काम आहे आणि त्यासाठी ते स्वतः या संकटकाळी आपल्या घरापासून दूर आहेत. सेलिब्रिटींनीसुद्धा पोलिसांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जाहीर धन्यवाद द्यायला सुरुवात केलीय आणि पोलीस अत्यंत विनम्रपणे त्याचा स्वीकार करतायत. अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबई पोलिसांना “जगात भारी’ म्हटलं तेव्हा “भारी तर मुंबईकर आहेत. आम्ही फक्त मुंबईला पुन्हा एकदा झकास बनवण्याचं मिशन पॉसिबल करण्याचा प्रयत्न करतोय,’ असा प्रतिसाद पोलिसांकडून मिळाला. अर्जुन कपूर, अभिषेक बच्चन आदी सगळेच सेलिब्रिटी पोलिसांची पाठ थोपटतायत आणि पोलीस म्हणतायत, “इट्स माय प्लेजर’!
अभिनेता अजय देवगणने पोलिसांना धन्यवाद देणारा व्हिडिओ शेअर केला, तेव्हा पोलिसांनी क्रिएटीव्हिटी दाखवत त्याच्याच चित्रपटांची नावं घेऊन उत्तर दिलं- प्रिय “सिंघम’, “खाकी’ने या परिस्थितीत जे करायला हवं, तेच आम्ही करतोय. परिस्थिती सुरळीत व्हायला हवी. “वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’! खरं तर अडचणीत सापडलेल्यांना मदत करणारे पोलीस आपण अनेकदा “पाहतो’; पण दे “दिसत’ नाहीत. सध्याच्या संकटानं खूप उंचीवर नेऊन ठेवलेलं पोलीस-नागरिक नातं अबाधित राहो!