पुणे – रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आठ वर्षीय मुलगी अतिकुपोषित अवस्थेत आढळली. तिला उभेही राहता येत नव्हते. ती फक्त “मामा’ हाच शब्द बोलू शकत होती. ही घटना नोव्हेंबर 2022 मध्ये घडली. यावर स्वयंसेवी संस्थेने मुलीला रुग्णालयात नेले. तेथे उपचार घेतल्यानंतर ही चिमुकली आता खेळू लागली आहे. बाल न्याय मंडळाच्या आदेशानंतर “नकोशी’ आता अनाथाश्रमात आहे. तिच्या पालकांचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
याबाबत “साथी रेल्वे चाइल्ड लाइन’चे समन्वयक राजबीरसिंह यांनी दैनिक “प्रभात’ला सांगितले, “मुलगी सापडली, तेव्हा ती शारीरिकदृष्ट्या कमकुवत होती. तिला त्वरित वैद्यकीय सेवा देण्यासाठी ससून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिच्यावर अत्यंत काळजी घेऊन उपचार केले. तिने अनेक दिवस काहीच खाल्लेले नव्हते. उपचार आणि योग्य आहारानंतर मुलगी हळूहळू बरी झाली आणि आता तिला अनाथाश्रमात पाठवण्यात आले आहे. ती आता इतर मुलांसोबत फिरू शकते आणि खेळू शकते. मात्र, “मामा’ हा शब्द उच्चारण्याशिवाय ती इतर काहीही बोलू शकत नाही. ती इतर कशावर प्रतिक्रिया देऊ शकते का, हे तपासण्यासाठी आम्ही तिला इतर खुणा किंवा वेगवेगळ्या शहरांची छायाचित्रे दाखवत आहोत. आम्ही देशातील विविध पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून आणि हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यासाठी काम करणाऱ्या इतर स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून तिचा पत्ता शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहोत.
कोणी सोडले असेल?
रेल्वे पोलिसांनी सांगितले की, “पुणे रेल्वे स्थानकाच्या आतील भागात जिथे मुलगी सापडली तिथे सीसीटीव्ही नाहीत. या मुलीला तिच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव कोणीतरी मुद्दाम सोडून दिल्याची शक्यता आहे.’
बोलीभाषेची अडचण…
सध्या ही मुलगी हरवल्याची तक्रार महाराष्ट्रातील कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल नाही. तिला “मामा’ हा शब्दच बोलता येतो. हा शब्द मराठी, हिंदी आणि एका दाक्षिणात्य भाषेत बोलला जातो. यामुळे ती नक्की कोणत्या राज्यातली आहे आणि तिला कोणती बोलीभाषा कळू शकते, हे कळणे अवघड बनले आहे.