पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वर्ग 1 ते 3 मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मालमत्तांची आणि दायित्वाची माहिती महापालिकेला दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतः आणि कुटुंबाच्या मालमत्तांचे विवरण पत्र 31 मे 2022 अखेरपर्यंत प्रशासनाला सादर करावे. तसे न केल्यास भविष्यात मिळणारी पदोन्नती किंवा प्रतिनियुक्ती देण्यात येणार नाही. त्याचबरोबर अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
राज्य सरकारच्या नियमानुसार महापालिकेतील अ, ब आणि क या वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मालमत्तांची आणि दायित्वाची दरवर्षी महापालिकेला माहिती सादर करणे बंधनकारक आहे. विवरण पत्र नसल्यास पदोन्नती किंवा सुधारित सेवाअंतर्गंत आश्वासित प्रगती योजनांच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात येईल. पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौऱ्यास विवरण पत्र असेही गरजेचे आहे.
वर्ग-1 आणि वर्ग-2 मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 31 मे अखेर मालमत्ता विवरण पत्रांची बंद पाकिटातून माहिती सादर करावी. वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांनी संगणक क्रमांक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, मालमत्ता विवरण पत्र सादर केले आहे? अशाप्रमाणे माहिती सादर करावी. मुदतीत विवरण पत्र सादर न केल्यास हे गैरवर्तन मानण्यात येणार आहे. तसेच अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात येणार येईल, असा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे.