प्रभातफेरी
नवरा-बायकोचे भांडण होते. पण दिवस मावळला की, ते म्हणे संपते. फार थोडी जोडपी भांडणे यापेक्षा जास्त ताणतात. मित्रांचे भांडण होते. पण खरे मित्र ते भांडण विसरून परत एक होतात. दोन कुत्री भांडतात. पण तेही हाडाचा तुकडा संपेपर्यंतच ते भांडण असते. भाद्रपद महिन्यात मात्र दोन काय चार कुत्री भांडत असतात. कामगार-मालक भांडतात. तेही भांडण मागणीपुरतेच असते. दोन गाढवं का बरे भांडत असतील?
अशी भांडणे होतात. पण खरे म्हणजे काही भांडणे होण्याचे कारणच नाही! एका गाडीच्या दोन बैलांनी का भांडावे? दोघांना मालक खायला देतो. दोघांना काठीचा मार. दोघांनाही राबवून घेतो. मुकाटपणे काम करणे हेच ज्यांच्या नशिबी त्यांनी आपापसात का भांडावे? हवी तर मालकावर शिंगे रोखावीत. हाच प्रकार एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनाही लागू होतो. दोघेही मालकासाठी दिवसभर काम करतात. पण टेबलाजवळचे सहकारी का भांडतात, कुणास ठाऊक?
अर्थात, हा प्रश्न सोडून देऊ. भांडणाला काही कारण लागत नाही. एका कारागृहात कैदी भांडतात. वॉर्डरवर हल्ले करतात. कैद्यांनी भांडणे करावीत यात अनपेक्षित असे काही नाही; पण कारागृहात कैद्यांसमोरच दोन पोलीस एकमेकांना भिडले. सुधारण्यासाठी कारागृहात ठेवलेले कैदी अशा भांडणातून काय धडा घेणार. दोन पोलिसांची फ्रीस्टाइल कुस्ती ही नव्या बदलत्या परिस्थितीची सुरुवात आहे. अहो, न्यायालयात चक्क न्यायाधीशासमोर दोन वकील भिडले, आता बोला!
राजकारणात सत्तेसाठी शह-काटशह दिले जातात. पुढारीही हमरीतुमरीवर येतात. सध्या तर राजकारण आखाडाच बनला आहे. रोजच अमुक एका नेत्याने दुसऱ्या नेत्यावर टीका करताना गलिच्छ भाषा वापरली. मग पुन्हा दुसरा नेता प्रत्युत्तर देताना आणखी गलिच्छ भाषा वापरतो. मग हे भांडण वाढत जाते. आणखी तिसरा कुणीतरी हे भांडण भडकावतो. दोन्हीकडची “सपोर्ट’ करणारी नेतेमंडळी म्हणतात, तुम्ही भांडा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नेते भांडतात म्हणून कार्यकर्तेही भांडतात. पण तुम्हाला यातील रहस्य सांगू का? ऐका, राजकीय नेते भांडतात. पण ते भांडण व्यासपीठावरचे असते. खासगीत त्यांची दोस्ती असते.
भांडणं बघत बसणे हा अनेकांचा आवडीचा प्रकार. शेजारच्या घरात, गल्लीत, रस्त्यात कोठेही भांडण दिसले की, तिथे बघ्यांची गर्दी जमलीच म्हणून समजा. भांडणं बघणे हा कायमस्वरूपी आनंद देणारा प्रकार. भांडणं अमर आहेत. बघ्याची भूमिका घेऊन भांडणाचा आनंद घेणारेही कमी नाहीत. राजकीय नेत्यांची भांडणं बघण्यात जो आनंद आहे असाच आनंद एका ठिकाणी असतो, जेव्हा तुम्ही थकूनभागून घरी येतात. कंटाळा येतो, तेव्हा टीव्ही सुरू करा. कोणतेही न्यूज चॅनेल लावा. तिथे चार-चौघं कुठल्यातरी विषयावर भांडत असतात आणि न्यूज अँकर त्यांचे भांडण आणखी भडकवतात. आपण त्या भांडणाची मजा बघायची आणि दिवसभरचा सर्व थकवा, कंटाळा काही क्षणात गायब. तुम्हीही हा प्रयोग करून बघू शकता.