आता दिग्दर्शक म्हणून अभिनेत्री रेणुका शहाणे तिसऱ्या प्रोजेक्टला सुरुवात करणार आहे. रेणुका शहाणेने 2009 सालीच “रिटा’ सिनेमाच्या दिग्दर्शनाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा सिनेमा तिच्या आईने लिहिलेल्या मरिटा वेलिंगकर नावाच्या कादंबरीवर आधारित होता.
त्यानंतर नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या “त्रिभंगा’चे दिग्दर्शनही रेणुका शहाणेने केले होते. “त्रिभंगा’मध्ये काजोल, मिथीला पालकर आणि तन्वी आझमी लीड रोलमध्ये होत्या. ती दिग्दर्शित करणार असलेल्या या नवीन सिनेमाच्या स्क्रीप्टवर सध्या रेणुका काम करते आहे. ही एक “डार्क कॉमेडी’ असणार आहे.
अलीकडेच रेणुकाने आपल्या लहानपणच्या काही आठवणी मांडल्या आहेत. वयाच्या 8 व्या वर्षी तिचे आई-वडील विभक्त झाले. त्यावेळी तिचे कुटुंब विभक्त झालेले असल्याने इतर मुलांना रेणुकाबरोबर त्यांचे पालक खेळू देत नसत. याचा आपल्या मनावर खोल परिणाम झाल्याचे रेणुकाने सांगितले.
तिच्या सिनेमाला अर्थातच कुटुंबातील कंगोऱ्यांची झालर असणार आहे. स्वतः अत्यंत हसतमुख असलेल्य या अभिनेत्री दिग्दर्शिकेला आपल्या सिनेमातही विनोद हा अविभाज्य भाग असावा असेच वाटते. म्हणूनच तिने “डार्क कॉमेडी’सारखा विषय निवडला आहे. मात्र या सिनेमातील कलाकार आणि अन्य तपशील अद्याप निश्चित झालेला नाही.