मुंबई – प्रख्यात अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यात 78 वर्षांच्या होत्या. त्यांचे 18 तारखेला निधन झाल्याची माहिती असून त्यांच्या मुलाने या बातमीला दुजोरा दिला आहे. हृदयक्रिया अचानक बंद पडून त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती उत्तम होती व त्यांना कसलाही त्रास नव्हता असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री 8 वाजून 40 मिनीटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
किरण बाला सचदेव हे त्यांचे मुळ नाव. 1944 मध्ये मुंबईत जन्मेलेल्या किरण सचदेव यांनी बेबी तबस्सुम या नावाने चित्रपटांतील आपली कारकीर्द सुरू केली. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार अरूण गोविल यांचे बंधु विजय गोविल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.
तबस्सुम यांनी 1947 मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. 1972 मध्ये त्यांनी सुरू केलेला दूरदर्शनवरील फुल खिले है गुलशन गुलशन हा सेलिब्रिटिंच्या मुलाखतीचा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. 1993 पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. त्यांचे बालकलाकार म्हणून पदार्पण झाल्यावर त्यांनी पहिल्याच चित्रपटात नर्गिस दत्त यांच्यासोबत काम केले व नंतर अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या.
मेरा सुहाग (1947), मंझधार (1947), बडी बहन (1949), दीदार (1951) आदी चित्रपटांत त्यांच्या लक्षवेधी भूमिका होत्या. गेल्या वर्षी करोनामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावेळी 10 दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मध्यंतरी त्यांना अल्झायमर झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र त्यांच्या मुलाने याचा इन्कार केला. त्यांना कोणताही आजार नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले.