कात्रज – कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावातील जवळपास 80 टक्के जलपर्णी काढण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून उर्वरित जलपर्णी लवकरात लवकर काढावी, अशी सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील कात्रज तलावात जलपर्णी साचल्याने लगतच्या कात्रज परिसरात डासांच्या प्रादूर्भाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी मार्च महिन्यांत अधिकाऱ्यांसह पाहणी करीत तलावातील जलपर्णी काढण्याच्या सूचना केल्यानंतर याबाबतचे काम सुरू करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 80 टक्के जलपर्णी काढण्यात आली आहे.
तलावातील वाढती जलपर्णी, दुर्गंधी व डासांचा प्रादूर्भाव याबाबत माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, प्रतिक कदम यांच्या मागणीवरून खासदार सुळे यांनी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या होत्या, त्यानुसार हे काम करण्यात आले. मैलायुक्त पाणी रोखण्यासाठी एसटीपी प्लॅंट बसविण्याचे काम लवकर पूर्ण करावे, सांडपाणी वाहिनी आणि इतर कामे प्रलंबित असून ती तातडीने पूर्ण करावीत तसेच, दूषित पाणी सोडून गाळ काढण्यात यावा, अशा सूचनाही खासदार सुळे यांनी केल्या.
यावेळी उपायुक्त माधव जगताप व इतर मनपा अधिकारी तसेच माजी नगरसेवक प्रकाश कदम, दत्तात्रय धनकवडे, युवराज बेलदरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खडकवासला शहर अध्यक्ष काका चव्हाण, प्रतिक कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.