सातारा – कराड येथील प्रांताधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेतील रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70) आणि दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय 70) या कंत्राटी तत्त्वावरील लिपिकांना 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
यातील तक्रारदार हे एका शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. भूसंपादन प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्यासाठी येरवळे, ता. कराड येथील नऊ शेतकऱ्यांकडून त्यांनी प्रतिज्ञापत्रे घेतली आहेत. त्यानुसार मूल्यांकन प्रक्रियेबाबत पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार कराड प्रांताधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेत गेले होते. रामचंद्र पाटील आणि दिनकर ठोंबरे या कंत्राटी तत्त्वावरील लिपिकांनी मूल्यांकन करण्यासाठी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदारांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्याकडे तक्रार केली होती.
वैद्य यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विक्रम पवार व सहाय्यक फौजदार शंकर सावंत, नीलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे यांनी मंगळवार, दि. 16 आणि बुधवार, दि. 17 रोजी तक्रारीची पडताळणी केली होती. या तक्रारीची खात्री पटल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कराड प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळी सापळा रचून रामचंद्र पाटील आणि दिनकर ठोंबरे यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कराड पोलीस ठाण्यात सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे येथील पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या कारवाईबद्दल सातारच्या पथकाचे अभिनंदन केले.