पुरोगामी पक्ष संघटना संयुक्त कृती समितीची महापालिकेकडे मागणी
पुणे – महापालिका शाळांमधील शिक्षक गेल्या पाच महिन्यांपासून करोनाच्या ड्युटीवर आहेत. या शिक्षकांना करोनाच्या कामातून मुक्त करावे, या मागणीसाठी पुरोगामी पक्षसंघटना संयुक्त कृती समितीतर्फे पुणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले आहे.
समितीचे निमंत्रक नितीन पवार, नीलेश वाघमारे, उषा नेटके, गोरख मेंगडे, आनंद बेदेमकर, संगीता कामठे, ओंकार मोरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. इयत्ता तिसरीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून द्यावेत. शिक्षकांमार्फत पहिलीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांना घरपोच वह्या, वर्कबुक व इतर शालेय साहित्य द्यावे.
माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन त्यांच्या घराजवळील 4 ते 5 विद्यार्थ्यांचा गट बनवून शिक्षण देण्याची प्रक्रिया राबवावी, पालकांच्या संमतीने शिक्षकांनी शाळेत येऊन 5 ते 10 विद्यार्थ्यांचा गट बनवून शिक्षण द्यावे, अशा मागण्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत.