पुणे, पिंपरी-चिंचवड कामकाजातून वगळले
पुणे – राज्यातील सहा जिल्ह्यात मंगळवारपासून दस्तनोंदणीला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यात 24 दस्तनोंदणी होऊन त्यातून राज्य सरकारला पाच लाखांहून रूपयांचा महसूल मिळाला. टप्प्याटप्प्याने राज्यातील अन्य भागातही दस्तनोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
करोना विषाणूचा संसर्ग ज्या भागात नियंत्रित आहे, असा भाग निश्चित करून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या भागात दस्तनोंदणी कार्यालय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारचे आदेश विचारात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने कार्यालय सुरू करताना त्या ठिकाणी काय काळजी घ्यावी, कोणत्या प्रकाराच्या दस्तनोंदणी सुरू ठेवावी, याबाबतच्या उपाययोजना व सूचना सर्व जिल्हा उपनिबंकांना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई वगळता आज पहिल्या टप्प्यात बुलढाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, वाशिम, उस्मानबाद, सांगलीचा रेड झोन वगळून या भागातील दस्त नोंदणी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आजपासून सुरू करण्यात आली. आज, दिवसभरात या दस्तनोंदणी कार्यालयात 24 दस्तांची नोंदणी झाली. त्यातून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला पाच लाख रूपयांचा महसूल मिळाला. येत्या दोन दिवसात ग्रीन झोन मध्ये असलेल्या शहरांमध्ये आणखी काही कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सुरू करण्यात येतील, असे नोंदणी महानिरीक्षक देशमुख यांनी सांगितले.