पुणे – लॉकडाऊनमुळे दस्त नोंदणी कार्यालये बंद आहेत. या पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक विभागाने सदनिकांची दस्त नोंदणी ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधा फक्त नवीन सदनिकांसाठीच असणार आहे. जुन्या सदनिका आणि भूखंड यांच्यासाठी ऑनलाइन दस्त नोंदणीची सुविधा मिळणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.
विकासकांच्या विक्री करारनाम्याच्या नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशनचा वापर वाढविण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे. यामध्ये ई-रजिस्ट्रेशन प्रणालीअंतर्गत प्रथम करारनाम्याच्या नोंदणीसाठी 500 दस्तांची अट रद्द करण्यात आली असून त्या प्रकल्पातील किमान 20 सदनिका अथवा दुकाने यांची विक्री करार नोंदणी करणे आवश्यक आहे. ई-रजिस्ट्रेशन सुविधा वापरण्यासाठी “एमपीएलएस व्हीपीएन’ ही इंटरनेट सुविधा आवश्यक होती, त्यामध्येही आता सवलत देण्यात आली असून, साधी इंटरनेट सुविधा असेल तरीही नोंदणी करता येणार आहे.
ई-रजिस्ट्रेशनसाठी ही आहे प्रकिया
इच्छुक विकासकाने प्रकल्प ज्या क्षेत्रात असेल, त्या सह जिल्हा निबंधक यांच्याकडे प्रस्ताव द्यावा. यामध्ये विकसक यांचा पत्ता ई-मेल आयडी, प्रकल्पाचा संपूर्ण तपशील, रेरा नोंदणी क्रमांक, विक्री करारनामा मसुदा आदी बाबी नमूद करणे आवश्यक आहे.