पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नोंदणी व मुद्रांक विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात झालेल्या जमीन, सदनिका यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या किंमतीचा अभ्यास करण्यात आला. यात पुणे शहर आणि ग्रामीण मधील काही भागातील मालमत्तांचे व्यवहार रेडी रेकनरच्या दरापेक्षा जादा दराने झाल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात सरासरी 7 टक्के, तर ग्रामीण भागात 12 टक्के इतक्या जादा दराने खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात वाढ केलेली नाही. यंदा रेडी रेकनरचे दर जैसे थे च ठेवले आहे.
दरम्यान नोंदणी व मुद्रांक विभागाने नवीन दर ठरविण्याबाबत 2023 -24 या आर्थिक वर्षातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या अभ्यास नोंदणी विभागाने केला. “एनआयसी’कडून वर्षभरातील व्यवहारांची माहिती जमा करून त्याआधारे केलेल्या तपासणीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील काही परिसरांमध्ये रेडी रेकनरच्या दरापेक्षा अधिक दराने व्यवहारांची नोंदणी झाल्याचे नोंदणी विभागास आढळून आले आहे.
ग्रामीण भागात वर्षभरात रेडी रेकनरच्या दरापेक्षा सरासरी 12 टक्के जादा दराने व्यवहार झाले आहेत. हवेली, मुळशी, मावळ या तालुक्यांतील शहरालगतच्या गावांमध्ये प्रामुख्याने रेडी रेकनरपेक्षा जादा दराने व्यवहार झाले आहेत. तर पुणे शहरातील उपनगर परिसरात रेडी रेकनरच्या दरापेक्षा 5 ते 7 टक्के इतक्या जादा दराने खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत.