नारायणगाव -नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरच्या घटनेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील दिले आहेत. जगताप यांना लवकरच न्याय मिळेलच, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
आमदार बेनके यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाची डॉ. भोसले हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. यावेळी डॉ. हनुमंत भोसले, सुजित खैरे, सूरज वाजगे, मुकेश वाजगे, अजिंक्य घोलप, रोहन वाजगे उपस्थित होते. दिनेश जगताप यांच्या करंगळीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
यावेळी आमदार बेनके यांनी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार यांनी केलेल्या अमानुष मारहाणप्रकरणी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिवजन्मभूमीत असे चुकीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी मी व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संपर्क करून माहिती दिली.
पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पवार यांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासनदिले आहे. आपल्या विनाकारण फिरण्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे. पोलीस व नागरिकांनी समन्वयाने वाद विवाद टाळून करोनाशी सामना करायचा आहे, असे बेनके यांनी सांगितले.
नारायणगाव येथील घटनेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांना दिले आहेत. ते चौकशी करून अहवाल सादर करतील.
– संदीप पाटील,पोलीस अधीक्षक, ग्रामीण, पुणे.