नगर – राज्य सरकारकडून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला जातो. मात्र कारणे देत निधी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, शेवगांव तालुक्यातील कोनोशी येथील अल्पभूधारक शेतकरी कुंडलिक खेडकर (वय 75) यांना मुत्राशयाशी संबंधित आजाराचे निदान झाले होते. शस्त्रक्रियेसाठी डाॅक्टरांनी अडीच लाख रुपये खर्च सांगितला. शेतकरी कुंडलिक खेडकर यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एवढा खर्च करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केला. मुलगा रोहिदास खेडकर यांनी यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आमदार मोनिका राजळे यांचे शिफारसपत्र, इतर आवश्यक कागदपत्रे रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याआधिच संबंधित विभागाकडे जमा केली होती. मात्र, आमदार राजळे यांनी दिलेल्या खासबाब पत्रावर मुख्यमंत्र्यांची सही नाही, तुमच्या वडिलांना आता डिस्चार्च मिळाला आहे, अशी वेगवेगळी कारणे देत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुखांनी मदत देण्यास नकार दिला.
कुंडलिक खेडकर यांचा मुलगा रोहिदास खेडकर यांनी सांगितले की, “वडिलांना 21 जुलै रोजी शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील किडनी युराॅलाॅजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 23 जुलैला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तर 25 जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आला. तत्पूर्वीच 20 जुलै रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केला होता. मात्र, आमदारांनी दिलेल्या खास बाब पत्रावर मुख्यमंत्र्यांची सही नाही, डिस्चार्ज झाल्यावर मदत देता येत नाही, अशी कारणे देत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी निधी देण्यास नकार दिला. आमची परिस्थिती खुप हलाखीची आहे. सततच्या नापिकीने आधीच आमच्यावर कर्ज आहे. त्यात आता आणखी कर्ज घेऊन रुग्णालयाचे अडीच लाख रुपये बिल दिले आहे. आम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अत्यंत गरज असून मदत मिळावी.”
आमदार मोनिका राजळे यांचे शिफारसपत्र –
कुंडलिक खेडकर यांना देण्यात आलेल्या शिफारसपत्रात आमदार मोनिका राजळे यांनी म्हंटले आहे की, “माझे मतदारसंघातील कुंडलिक संपत खेडकर, रा. कोनोशी, ता. शेवगांव, जि. अ.नगर यांना मुत्राशयाचा आजार आहे. त्यांचेवर किडणी अॅण्ड युरोलाॅजी सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल, पुणे येथे उपचार करावयाचे आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून उपचारासाठी येणारा खर्च ते करू शकत नाही. तरी त्यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतुन जास्तीत जास्त वैद्यकीय सहायता निधी द्यावा ही विनंती”, याप्रमाणेच खासदार सुजय विखे यांनीही शिफारस पत्र दिले आहे. मात्र तरीदेखील अल्पभूधारक शेतकरी कुंडलिक खेडकर यांना मदत मिळाली नाही.
दरम्यान, अल्पभूधारक शेतकरी खेडकर कुटुंबियांनी कर्ज काढून रुग्णालयाचे बिल भरले आहे. त्यामुळे सरकार अल्पभूधारक आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” देत नसल्याचे समोर आले आहे.