Priya Singh : सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर प्रिया सिंह (Priya Singh) जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी अश्वजीत गायकवाड (Ashwajit Gaikwad) याला ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारदेखील ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी हा MSRDC चे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे.
अश्वजीत आणि प्रिया यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पण आपण विवाहित आहोत हे सत्य त्यानं प्रियापासून दडवून ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी तिला हे सत्य कळलं. तिनं अश्वजीतला अनेकदा कॉल केला, पण तो फोन घेत नव्हता. अखेर त्यानं फोन उचलला, आणि घोडबंदर रोडवरील ओवळा भागातल्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ तिला बोलावलं.
View this post on Instagram
प्रिया तिथे गेल्यावर त्यांच्यात भांडण झालं आणि रागाच्या भरात अश्वजीतनं त्याचा ड्रायव्हर सागरला प्रियावर गाडी घालायला सांगितलं. सागरनंही त्याचं ऐकलं आणि भलीमोठी रेंज रोव्हर डिफेन्डर गाडी त्यानं तिच्या अंगावर घातली. त्यानंतर प्रियाला जखमी अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेले. अर्ध्या तासानं रस्त्यावरून जाणाऱ्या एकानं तिला पाहिलं आणि पोलिसांना बोलावलं. त्यानंतर प्रियाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
त्यानंतर प्रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली. प्रियाने तिच्याया पोस्टमध्ये अश्वजितसह त्याचे मित्र यांची नावे घेतली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, आदित्य ठाकरे यांना टॅग केले. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच एसआयटी स्थापन केली.
प्रिया सिंग ही एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर तसेच व्यावसायिक ब्यूटीशियन आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो एक पोस्ट शेअर केली. तिच्या अंगावर जखमांचे अनेक व्रण असल्याचे, पायाला लागल्याचे त्यात दिसत आहे. रुचग्णालयात दाखल असतानाचे तिचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले. अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी अश्वजीतसह रोमिल पाटील, सागर शेळके या दोघांना आज ठाणे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.