पौड – पौडला मुळशी प्रादेशिककडून दिवसाआड पाणी मिळते तसेच पौडमधील सर्व शासकीय कार्यालयांना विनाशुल्क पाणीपुरवठा करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी थकलेली बिले कमी करण्यात यावी, यांसह अशा विविध मागण्यांकरिता खासदार सुप्रिया सुळे यांना ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले.
यावेळी पौड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मोनाली ढोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, सागर ढोरे उपस्थित होते. खासदार सुळे यांच्याशी संबंधित विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे मोनाली ढोरे सांगितले. त्याचप्रमाणे मुळशीतील पौड हे तालुक्याची ग्रामपंचायत असून सदर ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय, सर्व बॅंक, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालय व पंचायत समिती, बांधकाम विभाग फॉरेस्ट अशी सर्व कार्यालय आहेत.
दररोजची बाजारपेठ, एस. टी. स्टॅन्ड जो पुणे कोलाड महामार्गाला जोडलेला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी तरंगती लोकसंख्या खूप असून आजची तरंगती लोकसंख्या 5 हजार आहे ती भविष्यात वाढ होऊन 20 हजार होऊ शकते. या गावात उच्च दाबाचे सबस्टेशन होण्यासाठी 5 डीपी मंजूर झाल्या असून, त्या मिळाव्यात.
खंडोबा मंदिर येथे सभामंडप व मल्लिकार्जुन मंदिर प्रदक्षिणा मार्ग करणेसाठी प्रत्येकी 5 लक्ष निधी उपलब्ध व्हावा विठ्ठलवाडी येथे प्रतिपंढरपूर हे विठ्ठलाचे मंदिर असून तेथुन पावसाळ्यात व इतर दिवशी लोकांना येण्या – जाण्यासाठी रस्ता खराब असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे जिल्हा परिषद पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता करणेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.