प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 -स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर केलेल्या वैद्यकीय शस्त्रक्रियेचा त्रास दूर करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ढोल-ताशा वादनाचा मंत्र आम्ही स्वीकारला आणि आमच्यामध्ये अमूलाग्र बदल घडला. दैनंदिन आयुष्यात आत्मविश्वास आणि उत्साह देखील निर्माण झाल्याचे सांगत स्तन कर्करोग शस्त्रक्रियेनंतर वेदना सहन करणाऱ्या महिलांनी चक्क ढोल-ताशा वादन केले. यामध्ये वृद्ध महिलांचाही समावेश होता.
निमित्त होते, आस्था ब्रेस्ट सपोर्ट ग्रुप पुणे आणि ढोल-ताशा महासंघातर्फे बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे! यावेळी उपस्थितांनी स्तन कर्करोग रुग्णांचे ढोल ताशा वादन प्रत्यक्षपणे अनुभवित त्याचे झालेले फायदे देखील जाणून घेतले. या उपक्रमासाठी ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, ज्येष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे.
स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांच्या हालचालींवर मर्यादा येतात. मात्र, ढोल-ताशा वादनाने हा त्रास कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर महासंघाकडे डॉ. कुलकर्णी यांनी अशा महिलांना आपण प्रशिक्षण द्यावे, अशी विनंती केली. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ आणि मंडळाचे कार्याध्यक्ष ओंकार कलडोणकर यांच्यावर ही जबाबदारी महासंघातर्फे सोपवण्यात आली आणि त्यांनी ती उत्तमरितीने पार पाडली आहे, असे ठाकूर म्हणाले.
वय वर्षे 40 ते 70 मधील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांच्यात अमूलाग्र बदल झाला आहे. हाताच्या वेदना कमी होणे, ताजेतवाने वाटणे, रक्तदाब नियंत्रणात येणे, कोणतेही काम करण्यास उत्साह, नैराश्यातून बाहेर पडण्यास बदल असे अनेक चांगले परिणाम वादनाने त्या रुग्णांमध्ये झाले आहेत, असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.