ग्राहकांच्या डोळ्यात हासू तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू
चिंबळी – मरकळच्या मंगळवार (दि. 17)च्या आठवडे बाजारात लाल कांदा 70 रुपये किलो असल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. दरम्यान, हे भाव आखणी काही दिवस असेच राहतील किंवा वाढतील ही अशी शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी शासनाच्या धोरणांमुळे धाकधूकही आहे.
मरकळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारातून ग्रामपंचायतीला आठ हजार रुपये उत्पन्न मिळते. तर या बाजारात शेळपिंपळगाव, वडगाव घेनंद, तुळापूर, फुलगाव, गोलेगाव, पिंपळगाव, सोळू, धानोरे, चऱ्होली आदी परिसरातील शेतकरी वर्ग तसेच व्यापारी आपल्या मालाची विक्रीसाठी येतो, त्यामुळे या मोठ्या आठवडे बाजारात खरेदीसाठी आसपासच्या सर्व गावांतून ग्राहकही मोठ्या संख्येने दर मंगळवारी येत असल्याने लाखोंची उलाढाल या बाजारातून होते.
आज या बाजारात मेथी, कोथींबीर, मिरची व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात आवाक वाढली होती. मेथी व कोथींबीरीस शेकडा 500 ते 600 रूपये शेकडा भाव मिळाला होता. तर लाला कांद्याने सर्वाधिक भाव खाला होता. 70 रुपयेने विकला जात असल्याने ग्राहकांनी थोडा हात अखडता घेतला होता.