चंद्रकांतदादांचा राजकीय उतारा काय?
निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना अडचणीत आणणाऱ्या पावसकर यांना पुन्हा संधी मिळू नये, असा प्रवाह आहे. त्याचबरोबर आयारामांना संधी न देता जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी परिश्रम घेणारे, प्रसंगी अंगावर गुन्हे घेणाऱ्यांची दखल घेण्याची निष्ठावंतांची मागणी आहे. पावसकर, ऍड भरत पाटील यांचीही जिल्हाध्यक्षपदाची एकेक टर्म झाली आहे. धनंजय जांभळे व विजय काटवटे हेदेखील इच्छुक आहेत. मात्र, जिल्हाध्यक्ष नेतृत्वात उजवा असावा, असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा हे निष्ठावंतांना न्याय देणार की, आयारामांची मर्जी राखणार, हा प्रश्न आहे.
सातारा – भाजपच्या शाखा विस्तार व पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमानिमित्त पक्षांर्तगत वादावादी रंगात आली आहे. 25 रोजी नूतन जिल्हाध्यक्षाची घोषणा होणार असल्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी, 23 रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातारा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात पक्षांतर्गत वादाची कोंडी फुटून निष्ठावंतांना न्याय मिळणार का, याची चर्चा आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे 23 रोजी साताऱ्यात येणार आहेत. या दौऱ्यात ते पक्षांर्तगत कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. मात्र, जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा गुंता ते कसा सोडवणार? याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनाच पुन्हा संधी द्यावी, अशी त्यांच्या समर्थकांची आग्रही मागणी आहे. मात्र, आता साताऱ्याला संधी मिळावी, अशी येथील कार्यकर्त्यांची मागणी आहे.
दत्ताजी थोरात व रवींद्र पवार यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाची धोरणे, कार्यक्रम ते सातत्याने राबवत असल्याने चंद्रकांत पाटील यांच्याकडून निष्ठावंतांना न्याय मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. मंडलप्रमुखांच्या निवडीत कराडच्या एकनाथ बागडी यांचा अपवाद वगळता इतर पाच मंडलांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. सातारा शहराध्यक्षपदाच्या निवडीवरूनही वाद आहे.
विकास गोसावी यांना पुन्हा संधी देण्यास विरोध आहे. सुनील काळेकर यांना सातत्याने अडचणीत आणले जात असल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे. शहराध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रशांत खामकर व विठ्ठल बलशेटवार हे “चमकोगिरी’ करणारे आहेत. पक्षबांधणीत त्यांचे योगदान काय, असा आक्षेप कार्यकर्ते घेत असून त्यांच्याविषयी पक्ष बैठकीत तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.