पाथर्डी – व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या व सध्या जमिनीवर सुटलेल्या आरोपीकडून मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी पेठेतील व्यापाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे केली. खैरे यांनी तातडीने या घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल यांच्याकडून या घटनेचा तपास काढून तो पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्याकडे द्यावा, अशी सूचना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना करत या घटनेतील मुद्देमाल व्यापाऱ्यांना देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
मूळ हैद्राबादचा असलेला व सध्या जिल्ह्यातील राहाता येथे राहत असलेल्या विनोदकुमार शर्मा या आरोपीने शहरासह तालुक्यातील अनेक व्यापाऱ्यांना खोटे बोलत व धनादेश देत जवळपास १२ लाख रुपयांचा माल घेतला व तो फरार झाला होता. मागील आठवड्यात या व्यापाऱ्याला पोलिसांनी राहाता येथून ताब्यात घेत त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. मात्र, सध्या तो जमिनीवर सुटला असला तरीही त्याच्याकडे आमचा माल असून तो ताब्यात मिळावा, अशी मागणी केली.
भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, सतीश गुगळे, सुनील कदम, राजेंद्र शेवाळे, धरम गुगळे, दीपक बाफना, डॉ. सुनील उरणकर, विकास देसरडा आदींनी खैरे यांची भेट घेतली. या वेळी मुटकुळे यांच्यासह उपअधीक्षक सुनील पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन दराडे, भगवान सानप हे उपस्थित होते. या वेळी बोलताना व्यापाऱ्यांनी शर्मा याने जो माल आमच्याकडून घेतला तो त्याने दुसऱ्यांना विकला असून त्याच्या राहाता येथील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास कोणत्या गाडीतून हा माल गेला व दुकानात आला ते लक्षात येईल. आजही त्याच्या दुकानात आमच्या कडून फसवून नेलेला माल आहे तो ताब्यात घ्यावा ,अशी मागणी केल्यानंतर खैरे यांनी या घटनेचा तपास लिमकर यांच्याकडे दिला जाईल. तसेच शर्मा याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासून त्याचा कोणाशी संबंध आला त्यांना ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन दिले.