चुकलेल्या रॅम्पचा खर्च अभियंत्यांकडून वसूल करा

पिंपरी – नाशिकफाटा येथील स्व. भारतरत्न जे.आर.डी. उड्डाणपुलाचा एक रॅम्प चुकला असून, त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे गेली आठ वर्षे हा रॅम्प विनावापर पडून आहे. याला जबाबदार असलेल्या अभियंत्यांकडून 12 कोटी रुपये खर्च वसूल करावा, अशी मागणी नगरसेवक राजू बनसोडे यांनी केली आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्ग व पुणे नाशिक महामार्गांना जोडणारा दुमजली भारतरत्न जे.आर.डी. उड्डाणपुल महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बांधला आहे. या उड्डाणपुलाला रात्री केलया जाणाऱ्या आकर्षक प्रकाशयोजनेमुळे शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी हे एक आकर्षण आहे.

मात्र पिंपळे गुरवकडून नाशिकफाटा येथे वाहनांना उतरण्यासाठी केलेला रॅम्प चुकला आहे. तीव्र उतारामुळे थेट नाशिकफाटा येथे वाहनांचा वेगाने प्रवेश होत असल्याने याठिकाणी अनेक अपघात झाले असून, जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शहरातील वाहतूक शाखेचा कोणताही अभिप्राय न घेतल्याने, हा रॅम्प चुकला असून, गेली आठ वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यामुळे हा चुकलेला रॅम्प महापालिकेने पाडावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. तसेच हा खर्च मेसर्स फन्सलटिंग इंजिनिअर्स सर्व्हिसेस व तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता संजय भोसले, दीपक पाटील संदेश खडतरे, कनिष्ठ अभियंता एस. खरात. सी. धानोरकर, एस. साळी या सर्वांकडून 12 कोटींचा खर्च वसूल करण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.