मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
संजय राऊत यांना उर्मिला मातोंडकरला पक्षाकडून उमेदवारी देण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “यासंदर्भात मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाचा असतो. मंत्रीमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रीमंडळाने अधिकार दिले आहेत”.
संजय राऊत यांनी यावेळी बिहारमधील मुंगेर हिंसाचारावर भाष्य केले. हा हिंदुत्वावर हल्ला असल्याचं ते म्हणाले आहेत. “पण आतापर्यंत ना राज्यपालांनी, ना तेथील भाजपाने यासंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असं विचारा? असं सांगणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागा एप्रिल ते जून या दरम्यान मुदत संपल्याने रिक्त झाल्या होत्या. राज्य सरकारकडून त्या जागांवर नियुक्त्यांसाठी काही नावे पाठविण्यात आली होती; परंतु संविधानातील तरतुदीकडे बोट दाखवत राज्यपालांनी विधान परिषदेवर राजकीय नियुक्त्या करण्यास नकार दिला.