एकूण रुग्णसंख्या 3524, तर चार बाधितांचा मृत्यू
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाचा धमाका सुरुच असून आतापर्यंत एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 186 व्यक्तींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 3524 झाली आहे. तर चार बाधितांचा आज मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 186 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
चार बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दुदुस्करवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे (ता. सातारा) येथील 62 वर्षीय पुरुष या दोन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कुरवली (ता. फलटण) येथील 59 वर्षीय पुरुष व नवसारी (ता. पाटण) येथील 60 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.