पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये भाजप नगरसवेक यांनी रात्री गोंधळ घातला होता. डॉक्टरांना धक्काबुकी व शिवीगाळ झाल्याचा आरोप करत डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यामुळे नगरसेवक संदीप वाघेरे यांना पक्षाच्यावतीने नोटीस देण्यात आली आहे.
वायसीएम रुग्णालायत रविवारी पहाटे नगरसेवक व डॉक्टर यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे सोमवारी सकाळी वायसीएममधील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. करोना सारखी भयंकर परिस्थिती असताना डॉक्टरांनी काम बंद केल्याने प्रशासनाचीही धावपळ झाली. डॉक्टरांशी गैरवर्तन केल्यामुळे पक्षाच्या वतीने सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी नगरसेवक वाघेरे यांना नोटीस दिली आहे. त्यामध्ये त्यांनी तीन दिवसांत खुलासा मागविला आहे. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा दिला ऩाही तर पक्षाच्या वतीने वाघेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे
याबाबत बोलताना नामदेव ढाके म्हणाले, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. अशा गैरवर्तनामुळे पक्षाची बदनामी होते. डॉक्टरांची चुकी असेल तर त्यांनी रीतसर तक्रार करायची होती. मात्र अशाप्रकारे पक्षाला धक्का लागेल असे वर्तन करायचे नव्हते. यापुढे कोणत्याही नगरसेवकाने चुकीचे काम केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. वाघेरे यांना नोटीस दिली आहे. त्यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.