चालू असलेल्या कामांचे प्रस्ताव आल्याने नागरिकांत तीव्र नाराजी
वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील विकास कामांच्या बाबतीत 15 जुलै 2020 रोजी काढण्यात आलेली ऑनलाइन निविदा प्रक्रिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या निविदा प्रक्रियेतील काही कामे प्रगतीपथावर असतानादेखील या कामांची निविदा निघाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून ही निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
याबाबत वाघोलीतील ग्रामस्थांतर्फे शेतकरी गणेश महादेव सातव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी हवेली, ग्रामपंचायत वाघोली यांच्याकडे या निविदा प्रक्रियेतील काही कामे केवळ कागदोपत्री रंगवली जात असल्याने तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
सातव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत वाघोली तालुका हवेली येथे दिनांक 15 जुलै 2020 रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने बि वन 2020 -21 साठी सूचना क्रमांक एक व सूचना क्रमांक दोन या निविदा अंतर्गत खुली निविदा नोटीस काढण्यात आली असून याअंतर्गत दिनांक 15 जुलै ते 22 जुलै 2020 रोजी रोजी दोन वाजेपर्यंत सदर कामाबाबत निविदा प्रक्रिया प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. वाघोलीमध्ये सूचना क्रमांक एक व सूचना क्रमांक 2 यामधील द्वितीय मागणी कामांबाबत दिनांक 15 जुलै 2020 रोजी च्या पूर्वी सूचना क्रमांक एक व सूचना क्रमांक 2 द्वितीय मागणीमध्ये नमूद केलेल्या कामांपैकी वार्ड क्रमांक चार व पाच मध्ये १)युनिक सोसायटी फुल मळा रोड ते कापुरी विहीर पर्यंत भूमिगत गटार करणे(एक कोटी 24 लाख 36 हजार 221 रुपये) या कामांमध्ये सद्यस्थितीला स्थानिक ठेकेदार यांनी सदर ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के काम केलेले आहे.
सदर हे काम ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या कोणत्याही परवानगीशिवाय झालेले आहे. सदर कामाबाबत काम चालू असताना चे फोटो देखील उपलब्ध आहेत. तरी सुद्धा पंचायत समिती हवेली यांच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून या कामाचे काम प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन न पाहता अंदाजपत्रक तयार करून सदर काम हे निविदा प्रक्रियेसाठी प्रस्तावित केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती हवेली यांच्या काही भ्रष्ट अधिकार्यांनी हा प्रकार ठेकेदार यांच्या संमतीने केलेला आहे. कागदोपत्री पैसे लाटण्यासाठी ही खटाटोप अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून चालू असून शासनाच्या नियमावलीला हरताळ फासण्यात येत आहे.
याशिवाय २) धवल तीर्थ ते सांडवा भैरवनाथ मंदिर पर्यंत भूमिगत गटार लाईन करणे या कामासाठी ( 77 लाख 17 हजार 144 रुपये) प्रस्तावित करण्यात आले आहेत.
३) वार्ड क्रमांक चार खारी बिर्ते धवल तीर्थ पर्यंत वितरण नलिका करणे यासाठी (सहा लाख 14 हजार 349 रुपये) प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या दोन आणि तीन या कामांमध्ये स्थानिक शेतकरी तथा मूळ जागामालक यांची निविदा प्रक्रिया राबवताना कोणतीही कायदेशीर पूर्वपरवानगी लेखी किंवा तोंडी स्वरूपात घेण्यात आलेली नाही . त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा व जागा मालकांच्या विरोध असून देखील सदर काम निविदा प्रक्रियेसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. कामांची देखील पाहणी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही. त्यामुळे जागा मालक व शेतकरी यांच्या वर जाणीवपूर्वक अन्याय करण्याच्या हेतूने सदर निविदा प्रक्रियांमध्ये काम प्रस्तावित करण्यात आले आहे.
स्थानिक ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्या संमतीने सदर बेकायदा कामांना कायदेशीर मान्यता देण्याचा प्रकार सध्या सुरू असून 15 जुलै 2020 रोजी काढण्यात आलेली निविदा तातडीने रद्द करून सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती हवेली यांच्याकडून अंदाजपत्रक तयार करणाऱ्या अधिकारी व स्थानिक ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सातव यांनी केली आहे.
वाघोली येथील निविदा प्रक्रिया बाबत चौकशी करून योग्य कारवाई करण्याबाबत गटविकास अधिकारी हवेली यांना तातडीने आदेश देण्यात आले आहे.
– संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद
ज्या शेतकऱ्यांनी कामांबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांकडून आमचे त्या कामांना हरकत नाही असे लेखी पत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संबंधित कामांना वर्क ऑर्डर देण्यात येणार नाही. अशा कामांचे टेंडर देखील ओपन करण्यात येणार नाही.
– वसुंधरा उबाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघोली