पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. काही ठिकाणी पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी पालन केले. परंतु पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे मात्र या आंदोलनात कुठेही सहभागी झाल्याचे दिसत नाहीत, एवढंच नाही तर कालपासून ते नॉटरिचेबल झाले आहेत.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर वसंत मोरे यांनी त्यांच्या भूमिकेला स्पष्टपणे विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचे सांगितले होते. यासर्वानंतर त्यांना मनसे शहराध्यक्ष पदावरुन बाजूला देखील करण्यात आले. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. पण आजच्या भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे पक्ष आणि मोरे यांच्यात नेमके काय सुरु आहे असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
पुणे शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर वसंत मोरे इतर पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. शिवाय वसंत मोरे यांनीही आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. परंतु मनसे आणि राज साहेबांची साथ सोडून कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.