सातारा -साताऱ्याच्या सोनगाव कचरा डेपोत जैविक कचऱ्याची वाढती समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे रुग्णालयांचे झालेले दुर्लक्ष व पालिकेच्या आरोग्य विभागाचे त्यावर कोणतेच नियंत्रण नसल्याने सोनगाव परिसरात जैविक प्रदूषणाची समस्या वाढली आहे. शास्त्रीय विल्हेवाटीला तिलांजली देण्याचे काम येथे होत असल्याने हा कचरा डेपो भविष्यात अडचणीचा ठरणार आहे.
रुग्णालयातून बाहेर पडणारा जैविक कचरा उघड्यावर अथवा कचरा डेपोत टाकणे कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची दंडात्मक तरतूद आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे सोनगाव डेपोत जैविक कचऱ्याचे ढीग साचू लागले असून पालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकाराकडे मात्र कानाडोळा केला आहे. असे प्रकार वारंवार घडत असताना प्रशासन कारवाईबाबत उदासिन का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सातारा शहरातून घंटागाड्यांच्या माध्यमातून दररोज 45 ते 70 टन कचरा संकलित केला जातो. मात्र, या संकलनात जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीची स्वतंत्र शास्त्रीय प्रक्रिया आहे. नेचर इन नीड नावाची संस्था ही जवाबदारी साताऱ्यात स्वतंत्रपणे हाताळते. कचऱ्याची सोनगाव डेपोतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते.
जैविक कचरा “नेचर इन नीड’ या संस्थेद्वारे संकलित केला जातो. या कचऱ्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावणे बंधनकारक असतानाही हा कचरा डेपोत उघड्यावर आढळून येत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कधी कधी तर चक्क हा कचरा जाळून टाकण्यात येतो. बऱ्याच वेळा कचरा संकलनामध्ये हा जैविक कचरा हाताळताना कचरावेचक हातांच्या जखमांनी जायबंदी झाले होते. जैविक कचऱ्याचा विषय जुना असला तरी अशास्त्रीय पध्दतीने तो उघडयावर फेकून देण्याच्या प्रकारात पुन्हा वाढ झाली आहे. दि. 20 मे व 26 मे रोजी डेपोत जैविक कचरा आढळून आला होता.
मात्र, पालिका प्रशासनाने हे प्रकरण करोनाच्या काळात गांभिर्याने घेतले नाही. यानंतर पुन्हा एकदा डेपोत सलाईनच्या रिकाम्या बाटल्या, इंजेक्शनच्या सुया, रक्ताच्या पिशव्या, कापसाचे बोळे, मुदत संपलेली औषधे, शस्त्रक्रिया करताना वापरले जाणारे हॅंडग्लोज आदी प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात आढळूून आला आहे. असा प्रकार वारंवार घडत असताना प्रशासनाला याची तूसभरही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.