पिंपरी (प्रतिनिधी) – जेवण करताना गिळल्यामुळे रुग्णाच्या पोटात गेलेली सेफ्टी पिन कोणतीही चिरफाड न करता दुर्बिणीच्या साहाय्याने काढण्यात पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. ही सेफ्टी पिन उघड्या स्वरूपात होती. त्यामुळे जठराला इजा होण्याचा धोका होता. मात्र, डॉक्टरांनी तातडीने उपचार करत धोका टळला.
रुग्णालयातील शल्यचिकित्सा बाह्यरुग्ण विभागात 55 वर्षीय पुरुष रुग्णाला उपचारासाठी दाखल केले होते. दाखल होण्याच्या तीन दिवसापूर्वी जेवण करताना नकळत रुग्णाने सेफ्टी पिन गिळली होती. ही सेफ्टी पिन जठरामध्ये अडकून बसली असे एक्सरेमध्ये सिद्ध झाले. तातडीने रुग्णाचे सी टी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी ती सेफ्टी पिन उघडी असल्याचे दिसून आले. ही उघडी सेफ्टी पिन जठराला इजा करू शकते म्हणून तातडीने एन्डोस्कोपी करण्यात आली.
कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता उघडी सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. हा रुग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे. शल्य चिकित्सक डॉ. वीरेंद्र आठवले यांच्या देखरेखीखाली संबंधित रुग्णावर उपचार सुरू होते. मेडीकल गेस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल डहाळे यांनी दुर्बिणीद्वारे ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. डॉ. शहाजी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.