गुवाहाटी -महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांनी तळ ठोकलेल्या गुवाहाटीतील लक्झरी हॉटेलने आणखी काही दिवस बुकिंग थांबवले आहे. त्यामुळे बंड करणाऱ्या शिंदे गटाचा तेथील मुक्काम लांबणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे गटातील आमदार काही दिवसांपासून गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहात आहेत. त्या हॉटेलने 30 जूनपर्यंत बुकिंग बंद ठेवले होते. आता ती मुदत वाढवून 5 जुलै करण्यात आल्याचे सोमवारी समोर आले. त्यामुळे आणखी काही दिवस बंडखोर आमदार त्या हॉटेलमध्येच राहणार असल्याचे सूचित झाले.
बंडखोर आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी त्या हॉटेलमधील 70 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. इतर पाहुण्यांना सध्या त्या हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाही. केवळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्ये मुक्कामाची परवानगी देण्यात आली आहे. ते हॉटेल गुवाहाटी विमानतळापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. हॉटेलच्या भोवती कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तिथे स्थानिक पोलिसांबरोबरच निमलष्करी दलांचे जवानही तैनात आहेत.