नवी दिल्ली – गुजरात भाजपच्या शिष्टमंडळाकडून दिल्ली मॉडेलची तपासणी केली जाणार आहे. त्या पाऊलामागे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना राजकीय शह देण्याची खेळी असल्याचे मानले जाते.
भाजपची प्रदीर्घ काळापासून सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत भाजपसमोर तगडे आव्हान उभे करण्याचा निर्धार आपने केला आहे. त्यातून आपने आतापासूनच गुजरातमध्ये दिल्ली मॉडेलचा मुद्दा मांडण्यास सुरूवात केली आहे. केजरीवाल सरकारचे मॉडेल दिल्लीसाठी प्रभावी ठरत असल्याचा दावा आपकडून केला जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर, दिल्ली मॉडेलचा मुद्दा निष्प्रभ ठरवण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून गुजरातमधील भाजपच्या 17 नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला भेट देणार आहे. त्या भेटीत आप सरकारच्या योजना आणि कामकाजाची माहिती घेतली जाईल.
ते शिष्टमंडळ दिल्लीतील पाणी आणि वीज पुरवठ्याची स्थितीही जाणून घेणार आहे. त्यामुळे दिल्ली मॉडेलची हवा काढून घेण्यासाठी गुजरात भाजप सक्रिय झाल्याचे दिसते.