कोल्हापूर – कोल्हापुरातील शिरोळमधून अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. यड्रावकर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जयसिंगपूर येथील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली. शिवसैनिक आणि अपक्ष आमदार व मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटात तुफान राडा झाला.
आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी पोलिसांचे कडे तोडून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करत संपर्क कार्यालयाकडे जाणारा फलक तोडून टाकला. पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटातील अतिउत्साही काही कार्यकर्त्यांवर लाठीमारही केला. या संपूर्ण घटनेत 4 कार्यकर्ते तर 6 पोलीस कर्मचारी हे किरकोळ जखमी झाले आहेत.
सोमवारी यड्रावकरांचे समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी शिवसैनिकांनी यड्रावकर समर्थकांवर दगडफेक केली आणि यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयाचा मार्ग दाखवणारा बोर्ड ही तोडून टाकला.
यावेळी यड्रावकर समर्थकही आक्रमक झाले आणि दोन्ही गटांमध्ये मोठी झटापट झाली. यादरम्य.ान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.