“दादा’ ही दोन अक्षरे उच्चारली की समोर उभा राहतो विकास कामांचा डोंगर. या त्यांच्या कर्तृत्वामुळे, कार्यशैलीमुळे असंख्य कार्यकर्त्यांच्या, जनसामान्यांच्या हृदयात अजितदादांचे स्थान अढळ आहे. जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस म्हणजे “खास’ दिवस. या वाढदिवसानिमित्त दादांच्या कर्तृत्त्वाचा आलेख…
सार्वजनिक जीवनात गेली चार दशकं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या दादांचे कर्तृत्व असामान्य आहे. विविध क्षेत्रांचा अभ्यास असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये दादांचे नाव आदराने घेतले जाते. आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू युवा पिढीसाठी प्रोत्साहन, प्रेरणा देणारे आहेत.
शिस्तबद्ध कामामुळे “उपमुख्यमंत्री’ पदाला वेगळे वलय आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि चार वेळा उपमुख्यमंत्री होणारे दादा देशातील एकमेव नेते आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले दादांचे नेतृत्व आहे. शेतकरी बांधव विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, ही भूमिका दादांनी सातत्याने मांडली. शेतकरी कर्जमाफी हे अलीकडचे उदाहरण आहे. करोनाचे संकट असताना राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असताना शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वर्ग करणारे देशातील एकमेव अर्थमंत्री म्हणजे दादा.
राजकीय जीवनात कार्यरत असताना दादांनी सामान्य कुटुंबातील युवक- युवतींना संधी दिली. राज्यातील उपेक्षित, वंचित, दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी ते प्रयत्नशील असतात. कितीही संकटे आली तरी कणखर व्यक्तिमत्वाचे दादा डगमगले नाहीत. राजकीय जीवनातील चढउतारांचा दादांनी अनेकदा सामना केला. कठीण काळात जनसेवेचा वसा कायम ठेवला. संकटं मोठ्या धैर्याने परतवली.
त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे त्यांचे वक्तृत्व, त्यांचा आवाज आहे. विधानसभा असो किंवा इतर सभा दादांचे भाषण म्हणजे विकासाची नांदी. जे बोलणार ते करून दाखवणार हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. सभा, बैठकांमध्ये प्रसंगी खडे बोल सुनावताना आणि चांगल्या कामाचे कौतुक करताना दादा हयगय करत नाहीत.
सारथी तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी दादांनी स्वतः स्वीकारली. आठ कोटींच्या मदतीची घोषणा केली. दोन तासांत निधी वर्ग केला. 24 तासांत सारथीच्या कार्यालयात जाऊन कामकाजाचा आढावा घेतला. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सारथीला जागा देण्याचे निर्देश दिले. हा दादांच्या कामाचा धडाका आहे. म्हणून “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ ही उक्ती सार्थ ठरवणारे नेते म्हणजे दादाच. करोनाचे मोठे संकट ओढवल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे स्वाभाविक आहे.
परंतु, या दोन्ही संकटांचा सामना दादा खंबीरपणे करत आहेत. केंद्राकडून 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत मिळावी, करोनाच्या मुकाबल्यासाठी 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे यासाठी पत्र लिहिले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली नाही. करोना प्रतिबंधक मास्क, टेस्टिंग व पीपीई किट्स्, व्हेंटिलेटर्सवरील “जीएसटी’ माफ करण्यासाठी केंद्राला पत्र लिहले.
कर्तव्य बजावताना करोनामुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. प्रॉपर्टी व्यवहारांच्या नोंदणीस परवानगी दिली. डीपीसीचा 25 टक्के निधी आरोग्यासाठी देणे, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना त्वरीत वेतन असे महत्वाचे निर्णय घेतले. महाराष्ट्राला आर्थिक सहकार्याची पंतप्रधानांकडे मागणी केली. शेती, बॅंकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी दिली.
मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली. करोनाच्या संकटात कसलीही तमा न बाळगता प्रत्यक्ष भेटी देऊन प्रश्न सोडविणे ही माणूसपण जिवंत असल्याची, संवेदनशील असल्याची साक्ष म्हणावी लागेल. आदरणीय दादांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे, दादा शतायुषी व्हावेत, दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत याच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा.
शिस्तप्रिय प्रशासक
नियोजनबद्ध काम करणारे, शिस्तप्रिय प्रशासक म्हणजे आदरणीय दादा. मंत्रिपदाचा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव दादांच्या पाठीशी आहे. सहकारी संस्थांमध्ये राज्यपातळीवर त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला. याठिकाणी कार्यरत असताना त्यांनी प्रशासक म्हणून वेगळा आदर्श निर्माण केला.
कोणतेही काम नियोजबद्ध असले पाहिजे, शिस्त असली पाहिजे, कामाची गुणवत्ता कायम राहावी, सरकारी पैशाची अनावश्यक उधळपट्टी होऊ नये, वेळेत काम पूर्ण झालेच पाहिजे या न्यायाने कार्यरत असलेले प्रशासक म्हणून दादांची सर्वत्र ख्याती आहे. कामात हयगय करणारांना कधी पाठीशी न घालणारे आणि उत्तम काम करणारांच्या पाठीशी उभे राहणारे दादा कुशल प्रशासक आहेत. कोणतेही हाती घेतलेले काम तडीस गेले पाहिजे हा दादांचा शिरस्ता आहे.
संतोष पवार, सातारा