शिक्रापूर (प्रतिनिधी) – शिक्रापूर ता. शिरूर सह परिसरात वारंवार कोरोनाचा शिरकाव होत असताना एकाच दिवशी सात जन कोरोना बाधित असल्याचे समोर आले, असून यामध्ये एका नामांकित खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरचा देखील समावेश आहे. यामध्ये एका रुग्णामुळे डॉक्टर कोरोना बाधित झालेले असून एक रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिक्रापूर सह परिसरातील अनेक गावांमध्ये दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक भयभीत झाले आहेत. तर आज शिक्रापूर येथील तळेगाव रोड परिसरातील एका सोसायटी मध्ये एक, मलठण फाटा परिसरातील दोन वेगवेगळ्या सोसायटी मध्ये दोन, २४ वा मैल वस्ती वरील एक, पुणे रोड लागतच्या एका वस्तीमध्ये एक, तर विठ्ठलवाडी गावातील एक युवक वेगळ्या आजाराने रुग्णालयात दाखल असताना त्याचा कोरोना अहवाल तपासाला असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मात्र त्या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर देखील कोरोना बाधित झाले आहे. तर आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये २४ वा मैल वस्ती वरील यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या घरातील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. तर विठ्ठलवाडी येथील रुग्ण आजारी असल्याने त्याच्यावर शिक्रापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
यावेळी सदर रुग्ण आजारातून बरा होत असताना त्याला अचानक ताप आला त्यामुळे तेथील डॉक्टरांना त्या रुग्णाबाबत शंका आल्याने त्यांनी त्याची कोरोना तपासणी केली तसेच स्वतः त्या रुग्णावर उपचार केलेले असल्यामुळे खबरदारी म्हणून स्वतःची देखील कोरोना तपासणी केली असता त्यांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर डॉक्टर स्वतः पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
तर शिक्रापूर येथील सदर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आलेल्या आहेत. शिक्रापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सर्व रुग्णांची माहिती घेत त्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
तसेच ग्रामपंचायतच्या वतीने रुग्ण राहत असलेल्या परिसरात फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तर शिक्रापूर परिसरात एकाच दिवशी सकाळी सकाळी सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.