बीजिंग : आपल्या धमाकेदार ऍक्शन पटांसाठी जगभरामध्ये प्रसिद्ध असलेला दिवंगत अभिनेता ब्रूस ली याचे नाव नव्याने चर्चेमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. याबाबत सविस्तर वृत्त असं की ब्रूस ली याची कन्या शॅनॉन ली हिने चायनामधील एका प्रसिद्ध फास्ट फूड समूहावर तब्ब्ल ३० मिलियन यूएस डॉलर्सचा खटला भरला आहे. शॅनॉनने रिअल कुंगफू नामक फास्ट फूड समूहाविरोधात सदर खटला दाखल केला असून रिअल कुंगफूने कोणतीही परवानगी न घेता ब्रूस ली यांचा फोटो आपल्या लोगोमध्ये वापल्याचा आरोप शॅनॉनने केला आहे.
शॅनॉनने याबाबत रिअल कुंगफूला रीतसर नोटीस देखील धाडले असून या नोटीसद्वारे तिने कंपनीने त्यांच्या लोगोमधील ब्रूस ली यांचा फोटो काढून टाकावा व नुकसान भरपाई म्हणून शॅनॉन चालवत असलेल्या ब्रुसली इन्टरप्राइजला ३० मिलियन यूएस डॉलर्स द्यावेत अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी स्पष्टीकरण देताना रिअल कुंगफूने आपण सदर फोटो वापरण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या परवानग्या प्राप्त केल्याने आम्ही ब्रूस ली यांचा फोटो गेल्या १५ वर्षांपासून वापरत असल्याचं म्हंटल आहे.