रुंदीकरणात वापरलेल्या साधन सामग्रीची होणार प्रयोगशाळेत तपासणी
कापूरहोळ-पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेल्या मुदतीत महामार्गाची कामे अपूर्णच ठेवली आहेत. रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे जिल्हाधिकारी समितीने केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. रुंदीकरण करताना वापरलेल्या साधन सामग्रीची प्रयोगशाळेत तपासणी करणार असल्याचे नमूद करत महामार्गाची दयनीय अवस्था कायम असल्याने या पथकाने येथील कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे-सातारा महामार्ग दुसऱ्या तपासणी जिल्हाधिकारी, व समिती यांच्या परीक्षेत प्राधिकरण पुन्हा नापास झाले असल्याचे समोर आले आहे. मागील 19 तारखेला चेलाडी फाटा येथे केलेल्या पहिल्या पाहणीत पथकाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स पहिल्याच परीक्षेत नापास केले, तर नुकत्याच दुसऱ्या पाहणीत पथकाने नाराजी व्यक्त केल्याने खेड-शिवापूर टोल नाक्यावर टांगती तलवार कायम राहिली आहे.
या पूर्वी स्थापन केलेल्या समितीने गुरुवारी पुणे-सातारा रस्त्यावर चेलाडी फाटा येथील सेवा रस्त्याची पाहणी केली. या पाहणीत देखील समितीने कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला असल्याचे भोरचे तहसीलदार अजितसिंह पाटील यांनी सांगितले.
पुणे-सातारा महामार्गावरील वरवे (ता. भोर) येथे सुरु असलेल्या उड्डाणपूल आणि दोन्ही बाजुच्या सेवा रस्त्यांची दुरुस्ती बुधवारी (दि. 25) पूर्ण होणार होती. जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीने गुरुवारी सांयकाळी पाहणी केली. या समितीचे सदस्य, भोरचे तहसीलदार अजित पाटील, नायब तहसीलदार मनोहर पाटील, समीर मुलाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजू ठाणगे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सचिन काळे, अशासकीय सदस्य दिलीप बाठे, ज्ञानेश्वर दारवटकर, विलास बोरगे, अमोल पांगारे, अमर बुदगुडे, डॉ. संजय जगताप, विक्रांत भोरडे, नाना जाधव, बाळासाहेब भोरडे, समीर निगडेकर, गोरख मानकर तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.
रस्ता रुंदीकरण आणि कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे या पाहणीत आढळून आले. यात प्रामुख्याने उड्डाणपूलाच्या भरावासाठी मुरूम न वापरता सरसकट माती वापरली जात आहे. तसेच एक दिवसापूर्वी केलेले डांबरीकरण रातोरात उखडलेले आहे. अर्धवट सेवा रस्ते, दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे, कमी उंचीची दुभाजक, वाढलेली अतिक्रमणे, मुख्य सेवा रस्त्यासाठी दोन्ही बाजूला अद्याप पूलच बांधले नसल्याचे आढळून आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजू ठाणगे यांनी रुंदीकरणात वापरत असलेली सामग्री प्रथमदर्शनी निकृष्ट असल्याचे सांगत या साधन सामग्रीची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.
- पाहणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार-
ज्या पद्धतीने कामे होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे महामार्गाची कामे झाली नाहीत. कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा सविस्तर अभिप्राय जोडून पाहणी अहवाल समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे, असे भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी यावेळी सांगितले. - महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात खेड-शिवापूर टोलनाका हटाव संघर्ष समिती आणि लोकप्रतिनिधी यांना दिलेली आश्वासने पूर्ण करताना दिसून आली नाहीत. केवळ वेळ मारून नेहण्याचे काम करताना दिसून येत आहे. अधिकारी अशा पध्दतीने सर्वांची का फसवणूक करीत आहेत. कामे वेळेत का पूर्ण झाली नाही याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जाणीव पूर्वक चुकीचे काम करणाऱ्यांना याचा आज ना उद्या जाब द्यावाच लागणार आहे.
-चंद्रकांत परदेशी, समिती सदस्य.