नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायमच कॉंग्रेस आणि गांधी कुटुंबाला लक्ष्य केले जाते. आता कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे.
आपले बंधु आणि कॉंग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांना हिंदुत्वाबाबत मोदी यांच्यापेक्षा अधिक माहिती आहे. हिंदू धर्माबाबत जर मोदी यांनी राहुल यांच्याशी जाहीर चर्चा केली तर त्यांचा वाईट रितीने पराभव होईल असा दावा प्रियंका यांनी केला.
एका प्रसिद्ध न्यूज चॅनलशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी यांच्यावर प्रसार माध्यमांसह भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एवढा हल्ला केला आहे , इतके अपशब्द वापरले आहे, इतका चुकीचा समज पसरवला आहे तरी राहुल यांच्यात एवढे धाडस आहे की ते त्यांच्यासमोर झुकले नाहीत आणि त्यांना घाबरलेही नाहीत.
दरम्यान, राहुल गांधी पंतप्रधान होणार का असे प्रियंका यांना विचारले असता ते पंतप्रधान का नाही होऊ शकत असा प्रतिसवाल त्यांनी केला.त्यांना देशाची सखोल माहिती आणि समज असल्यामुळे ते चांगले पंतप्रधान होऊ शकतात. उद्या जर मोदींनी राहुल यांच्याशी हिंदू धर्माबाबत चर्चा केली तर मी पूर्ण खात्रीने सांगते की राहुल यांच्याशी बोलू शकणार नाहीत.