वाशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासोबतच उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी वाद-विवादादरम्यान मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घणाघात केला आहे.
उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माइक पेंस यांच्यात हा वाद-विवाद चांगलाच रंगला. यावेळी कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांना अमेरिकी इतिहासातील सर्वांत अयशस्वी अध्यक्ष असल्याची टीका केली. ट्रम्प पुन्हा निवडून येण्याची शक्यता धूसर असल्याचेही हॅरिस यावेळी म्हणाल्या.
यावेळी चीन, करोना, जलवायू परिवर्तन यासारख्या मुद्द्यांवरही वादविवाद झाला. हॅरिस यांनी करोना विषाणूमुळे 2 लाखांपेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडल्याचा दावा केला. करोनाच्या उपयायोजनेत ट्रम्प प्रशासनाने वेळकाढूपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ऊताहच्या सॉल्ट लेक सिटीत हा वाद-विवाद 90 मिनिटे चालला. यावेळी कमला यांनी त्यांच्या आईची आठवण काढून भावूक वातावरण निर्माण केले होते. या वाद-विवादात ट्रम्प यांना धारेवर धरल्याने हॅरिस ह्या पेंस यांच्यापेक्षा उजव्या ठरल्याचे दिसले.