चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने कित्येकांची कारकीर्द घडवल्याचे आपण ऐकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही तर देशांतर्गत व आयपीएल स्पर्धेतही तो अनेकांचा गॉडफादर बनला आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही धोनीने वरुण चक्रवर्तीचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या वरुणला थेट मैदानात कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. वरुण यंदाच्या आयपीएल स्पर्धेत जरी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असला तरीही आपण धोनीकडूनच प्रेरणा घेतल्याचे अभिमानाने सांगतो.
विश्रांतीनंतर किंवा काही काळानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरताना जी सकारात्मक मानसिकता आवश्यक असते त्यासाठी वरुणने खूप मेहनत घेतली. धोनीचा आदर्श ठेवत त्याने कॉर्पोरेट जगत सोडून क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला व तो यशस्वीही ठरवला.
वरुण जरी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात नसला तरीही चेन्नई व कोलकाता यांच्यातील सामन्यात त्याने धोनीची भेट घेतली व त्याच्याशी चर्चा केली. तेव्हापासूनच आपल्या दृष्टिकोनात अमुलाग्र बदल झाल्याचे वरुण सांगतो. याच सामन्यात आणखी एक चमत्कार घडला.
ज्याला आदर्श मानतो त्याच धोनीला वरुणने बाद केले. त्याच्या गोलंदाजीचे कौतुक खुद्द धोनीनेही केले. तसे पाहायला गेले तर वरुण लहानपणापासूनच क्रिकेटच्या वेडाने झपाटलेला होता. त्याने शालेय स्तरावरही कामगिरी सिद्ध केली होती.
महाविद्यालयीन क्रिकेटमध्येही त्याने सरस कामगिरी केली. मात्र, 12 वीत असताना एका सामन्यात त्याला दुखापत झाली व त्याला क्रिकेटपासून लांब व्हावे लागले. त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी पत्करली. मात्र, त्याचे मन तिथे रमत नव्हते.
दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर मात्र, त्याने चक्क नोकरी सोडली व पुन्हा एकदा मैदानात पाऊल ठेवले. आर्किटेक्ट बनलेला वरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून पुन्हा क्रिकेटकडे वळला व त्याने सातत्याने सरस कामगिरी केली व आपली गपणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. नोकरी सोडल्यानंतर त्याने तमिळनाडू प्रीमिअर लीगमधील एका संघाकडून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभाग घेतला. त्यात केवळ 9 सामने खेळताना त्याने 22 बळी मिळवले.
तमिळनाडू लीगमध्ये चमकदार कामगिरी केल्यावर त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्बल 8 कोटी 40 लाख रुपये देत आपल्याकडे घेतले. तेव्हा खरेतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मात्र, त्याच्या गोलंदाजीतील विविधता पाहून आता त्याच्यावर टीका करणारेही त्याचे कौतुक करत आहेत. त्याच्या भात्यात ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर आणि टॉप स्पिन असे विविध चेंडू असल्याने फलंदाजांचीही भंबेरी उडताना यंदाच्या आयपीएलमध्ये दिसून आली आहे. तमिळनाडू प्रीमिअर लीगमधील फाइंड असला तरीही वरुणला भविष्यात चांगली संधी मिळू शकते.
राज्याच्या रणजी संघात, तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्येही त्याला स्थान मिळून शकेल, अशी त्याची कामगिरी निश्चितच आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर लगेचच जवळपास चार महिन्यांच्या अंतराने 2021 सालची आयपीएल स्पर्धाही होणार आहे.
त्यापूर्वी भारतीय संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाल्याने त्याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. याच व्यासपीठावरून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कवाडे खुली झाली आहेत. आता प्रतीक्षा आहे की, त्याने या संधीचे सोने करावे इतकीच.