करोना काळात रिझर्व्ह बॅंकेकडून कर्जधारकांना ‘मोठा’ दिलासा; वाचा कोणाला होणार लाभ…

मुंबई – कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थकारणाला मोठा फटका बसला असल्याने रिझर्व्ह बॅंकेने व्यक्‍तिगत स्वरूपात घेतलेल्या किंवा छोट्या व्यावसायिकांच्या कर्जाच्या पुनर्गठणाला अनुमती दिली आहे. कोविड उपचारांसाठी वैद्यकीय सहाय्य व आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठीही रिझर्व्ह बॅंकेने 50 हजार कोटी रुपयांचा निधी तयार ठेवला आहे.

31 मार्च 2022 पर्यंत हा निधीचा पर्याय खुला ठेवला आहे. या निधीचा वापर लसीचे उत्पादन, लस आयात करणे, रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे, ऑक्‍सिजन पुरवठ्याची यंत्रणा विकसित करणे, व्हेंटिलेटर्स खरेदी करणे अशा कामासाठी करता येणार आहे. या निधीतून दिले जाणारे कर्ज हे अग्रक्रम क्षेत्रासाठीचे कर्ज समजले जाईल.

कर्जाच्या पुनर्गठणासाठी 25 कोटी रुपयांचे लघुउद्योगाला दिलेले कर्ज किंवा व्यक्‍तिगतरित्या दिलेल्या कर्जाला ही पुनर्गठणाची सवलत दिली जाणार आहे. या आधी ज्यांनी कर्जाच्या पुनर्गठणाचा लाभ घेतलेला नाही त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने छोट्या बॅंकांनाही दहा हजार कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्याची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत छोट्या बॅंकांना हा निधी दीर्घमुदतीच्या कर्जाची रक्कम म्हणून वापरता येईल. आता बॅंकांमार्फत जो ओव्हरड्राफ्ट दिला जातो त्याच्या परतफेडीची मुदतही 36 दिवसांपासून 50 दिवस अशी करण्यात आली आहे.

बॅंक ग्राहकांसाठी आता व्हिडिओ केवायसीलाही अनुमती देण्यात आली आहे. ज्यांचे केवायसी पेंडिंग आहे त्यांच्यावर 31 डिसेंबर 2021 पर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.