पुणे : मराठा आरक्षण फेटाळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शहरात कोठेही अनुचित प्रकार तसेच आंदोलने झाली नाहीत. मराठा समाजातील विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी निर्णय देण्यात आला. पोलिसांनी मराठा समाजातील विविध संघटना आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला होता. व्यक्तिगत पातळीवर पोलिसांनी प्रत्येकाशी संवाद साधला. शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत आंदोलने, निदर्शने करण्याची भूमिका योग्य नाही, असे आवाहन पोलिसांनी केले होते.
पोलिसांनी केलेल्या आवाहनाला मराठा समाजातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शहरात अनुचित प्रकार घडले नाहीत तसेच आंदोलनही करण्यात आले नाही, असे डॉ. शिसवे यांनी नमूद केले.