रिझर्व बँकेकडून अनपेक्षितरीत्या व्याजदरात मोठी कपात जाहीर

व्याजदर 20 वर्षाच्या नीचांकी पातळीवर

मुंबई: रिझर्व बॅंकेने शुक्रवारी अनपेक्षितरीत्या व्याजदरात मोठी कपात जाहीर केली. त्यामुळे आता रिझर्व्ह बॅंकेचे व्याजदर 20 वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत. भांडवलाचा वापर करून नागरिकांनी आणि उद्योगांनी काम वाढवावे अशी रिझर्व बॅंकेची अपेक्षा आहे. केंद्राच्या 20 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजमध्येही कर्जावरच भर दिला आहे. त्याचबरोबर जुन्या कर्जाचे हप्ते देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

गेल्या महिन्यातही रिझर्व बॅंकेने अशीच अनपेक्षितरीत्या मोठी व्याजदरात कपात केली होती. याबाबत माहिती देताना रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी रिझर्व बॅंकेने मुख्य व्याजदरात म्हणजे रेपो दरात 0.40 टक्‍क्‍यांची कपात करून तो केवळए 4 टक्के केला आहे. इतर बॅंकांच्या रिझर्व बॅंकेतील ठेवीवरील व्याजदरात म्हणजे रिव्हर्स रेपाही कमी करून तो 3.75 टक्‍क्‍यांवरून 3.35 टक्के केला आहे. सन 2000 नंतर हे व्याजदर इतक्‍या कमी पातळीवर पहिल्यांदाच गेले आहेत.

त्यामुळे घर, वाहन आणि इतर कर्जाचे व्याजदर रेपो दराच्या प्रमाणात कमी होणे अपेक्षित आहे. रिझर्व बॅंकेने इतर बॅंकांना लवकरात लवकर रेपोच्या प्रमाणात कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची सूचना केली आहे. करोना व्हायरसमुळे 40 वर्षात प्रथमच विकास दर शुन्य टक्‍क्‍याच्या खाली जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र महागाई नियंत्रणात राहू शकते. महागाई जर नियंत्रणात राहिली तर भांडवल सुलभतेसाठी आणखी उपाययोजना करण्याची शक्‍यता रिझर्व बॅंकेने खुली ठेवली आहे.

विकास दर शुन्य टक्‍क्‍याच्या खाली
उद्योगांची आणि नागरिकांची उलाढाल ठप्प झाल्यामुळे यावर्षी विकास दर 40 वर्षात प्रथमच शुन्य टक्‍क्‍यांच्या खाली रेंगाळण्याची शक्‍यता रिझर्व बॅंकेने व्यक्त केली आहे. लॉक डाऊनमुळे या आर्थिक वर्षातील पहिले सहा महिने वाया गेले आहेत. दुसऱ्या सहा महिन्यांमध्ये परिस्थिती बिघडली नाही तर थोडीफार उलाढाल होण्याची शक्‍यता आहे. पुरवठा साखळी खंडित झाली आहे. ती सुरू होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. त्याचा विकास दरावर परिणाम होणार आहे. वीज आणि इंधनाचा वापर कमी झाला आहे. मागणी ठप्प झाली आहे. त्याचा विकास दरावर परिणाम होत राहणार आहे. भारतातील सहा औद्योगिक दृष्टया सुधारलेली रेड झोन मध्ये आहेत.

कर्जाचा हप्ता देण्यास तीन महिने मुदत वाढ
लॉक डाऊनमुळे नागरिक आणि उद्योगांची उलाढाल ठप्प झाली आहे. यासाठी या अगोदरच रिझर्व बॅंकेने कर्जाचा हप्ता देण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ दिली होती. याचा फायदा 1 मार्च ते 31 मार्च 2020 दरम्यान अनेकांनी घेतला आहे. मात्र लॉक डाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे रिझर्व बॅंकेने कर्जाचा हप्ता भरण्यास आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात ज्यांना हप्ता देणे शक्‍य नसेल त्यांनी हप्ता देण्याची गरज नाही असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. ज्या कालावधीत हप्ता दिलेला नाही तो कालावधी पुढे ढकलला जाऊ शकतो. 31 ऑगस्टनंतर कर्जाचे हप्ते पुन्हा सुरू होतील. दरम्यानच्या काळात मुद्दलावरील व्याज आकारले जाईल आणि त्या प्रमाणात हप्ते पुढे ढकलले जातील. कर्जदाराच्या खात्याच्या मूल्यांकनावेळी बॅंकांनी सवलत दिलेला कालावधी वगळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.