नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने बोटांना लोशन लावताना त्याची माहिती मैदानावरील पंचांना सांगितली नाही म्हणूनच त्याला आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचा खुलासा सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून सात गडी बाद केल्यावर फलंदाजीतही चमक दाखवताना जडेजाने 70 धावांची खेळीही केली. जडेजाने खूप मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन केले होते. तसेच तो बळी घेण्यात यशस्वी होत असल्याने त्यालाच जास्त षटके गोलंदाजी देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या बोटांवर ताण येऊ लागला होता. त्यावेळी त्याने महंमद सिराजला पाचारण करत बोटांवर लावण्यासाठी लोशन आणण्यास सांगितले होते.
त्याने बोटांना हे लोशन लावल्यावर ते रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट दिसले. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनीने आक्षेप घेत कारावाईचीही मागणी केली होती. त्यावेळी सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांनी त्याच्याकडे याबाबत विचारणाही केली व त्यावर समाधानही व्यक्त केले होते. मात्र, त्याने मैदानावरील पंचांना याची कल्पना दिली नसल्याचे समोर आल्यावर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
ICC Women’s T-20 World cup #INDvPAK : भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय
जडेजाला एक डी-मेरिट पॉइंट देण्यात आला असून त्याला सामना रकमेच्या 25 टक्के दंडही ठोठावण्यात आला. आचारसंहितेचे कलम 2.20 नूसार ही कारवाई करण्यात आली आहे. पंचांची परवानगी न घेता हे घडल्याची कबूली जडेजाने दिली व त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. हे लोशन केवळ वैद्यकीय उपचार म्हणूनच बोटाला लावल्याचे त्याने सांगितले व त्यावर सामनाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले मात्र, याची कल्पना त्याने पंचांना दिली असती तर कारवाई टळली असती असेही पायक्रॉफ्ट यांनी स्पष्ट केले आहे.