Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शितया चित्रपटात अभिनेते रवी काळे झळकणार आहेत. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू चित्रपटसृष्टी काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे रवी काळे आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. या स्वराज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका रवी काळे ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात साकारणार आहेत.
विशेष म्हणजे या चित्रपटानिमित्त रवी काळे पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आजवर विविधांगी भूमिका साकारणारे रवी काळे आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
तर या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील दिसणार आहे. अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. दिग्पाल यांच्या ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर आता दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे.