कराड, (प्रतिनिधी) – संजय राऊत यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही. अंडरवर्ल्डशी कोणाचे संबंध आहेत आणि ते कोणत्या पुण्याकर्मासाठी 100 दिवस तुरुगांत जाऊन आले होते, याचा खुलासा त्यांनी आधी करावा. आपण जामिनावर बाहेर आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
कराड येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता, माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात अहोरात्र काम करत आहोत. नाहक, बिनबुडाचे आरोप करणार्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. संजय राऊत यांची अजून निर्दोष मुक्तता झालेली नाही. तुमचे कोणाशी संबंध आहेत? कोणत्या पुण्याकर्मासाठी तुम्ही तुरुंगात जाऊन आलात, याचे आधी उत्तर द्या आणि मग आमच्या मुख्यमंत्र्यांवर बोला.
लोकसभा निवडणुकीत सातारच्या जागेबाबत विचारले असता, ते म्हणाले, महायुतीमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय घेतील. शिवसेनेच्या जागावाटपाचे निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे घेतील. ते जे सांगतील, त्याची अंमलबजावणी आम्ही करू.