सातारा,(प्रतिनिधी)- धर्मवीर संभाजी महाराज यांचे सुपुत्र व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या जन्मोत्सवानिमित्त जन्मभूमी ते कर्मभूमी गांगवली (जि. रत्नागिरी) ते सातारा असा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
साताऱ्यातील शिवतीर्थावर या पालखी सोहळ्याचे स्वागत उद्या दि. 18 मे रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष व छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळ्याचे समन्वयक सुहास राजेशिर्के यांनी दिली.
छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी सातारा शहराची स्थापना केली. म्हणूनच सातारा नगरीला शाहूनगरी असे संबोधले जाते. मात्र, त्यांच्या स्मृती जागवणारे कोणतेही ऐतिहासिक चिन्ह सातारा शहरात नाही. त्यामुळे येसूबाई फाउंडेशन आणि छत्रपती शाहू महाराज थोरले समन्वय समितीच्यावतीने जन्मभूमी ते कर्मभूमी अशी संकल्पना घेऊन गांगवली ते सातारा असे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे. उद्या दि. 18 रोजी सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे पोवई नाका शिवतीर्थावर आगमन होणार आहे. साताऱ्यातील शाही घराण्याच्या वारसदारांच्या मार्गदर्शनाखाली या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. पोवई नाक्यावर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे .
सातारा येथील बाराव्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारी धैर्या विनोद कुलकर्णी हिचा यावेळी विशेष सत्कार होणार आहे. नागरिकांनी या पालखी सोहळ्याला उपस्थित राहवे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. माणगाव- रायगड- पोलादपूर- महाबळेश्वर- मेढा मार्गे हा सोहळा साताऱ्यात दाखल होणार असून ठिकठिकाणी पालखीचे स्वागत होणार आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून येथून हा पालखी सोहळा छत्रपती शाहू महाराजांची समाधी असणाऱ्या क्षेत्र माहुली येथे जाणार आहे.