जुन्नर (वार्ताहर) – नाणेघाट (ता. जुन्नर) परिसरातील आडोशी गावाजवळील (लव्हाळी) डोंगरकड्यात दोन नर रानगव्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) दुपारी उघडकीस आली. येथील वऱ्हाडी डोंगराच्या अतितीव्र उतारावरुन अंदाजे १६० मीटर उंचीवरून हे गवे घसरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. येथील घाटघर, अंजनावळे परिसरात गेल्या आठवड्यापासून हे अंदाजे १५ वर्षे वयाचे गवे फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. अतिसंरक्षित प्राण्यांचा दर्जा असलेले हे गवे यापूर्वी २०१५ व २०१७ मध्ये याच परिसरात दिसले होते.
अधिक माहितीनुसार घाटघर परिसरात आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांच्या बाजरी व इतर पिकांमध्ये या गव्यांनी शिरकाव केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्याच्या हेतुने या गव्यांना हुसकावले होते. तेथून ते अंजनावळे भागात आले होते. येथील निसरड्या कड्यावरून घसरून पडल्याची घटना दोन-तीन दिवसांपूर्वी घडली असावी, अशी शक्यता उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी घटनास्थळाची पाहणी करून व्यक्त केली आहे.
गवा हा एक शाकाहारी सस्तन प्राणी असून भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळत असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. हत्ती, गेंडा, पाणघोडा व जिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी असून ग्रामस्थांना असे दुर्मिळ प्राणी आढळल्यास त्याला इजा न करता वनविभागाला तातडीने कळविण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
या दरम्यान सहायक वनसंरक्षक भुर्के तसेच परिसरातील वनपाल, वनरक्षक यांनी संपुर्ण परीसर चेक केला असता पडलेल्या ठिकाणापासून कड्याच्या बाजूस जमिनीवर ओरखडे असल्याचे दिसून आले. उभ्या कड्यावरून पडल्यानेच गंभीर जखमा तसेच अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने हे गवे मृत झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी शशिकांत डुंबरे व बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखील बनकर यांनी दिली. अधिक तपासणीसाठी या दोन्ही गव्यांचे संबंधित नमुने फाॅरेन्सीक लॅबला पाठविण्यात आले आहेत.