पिंपरी – पिंपरी चिंचवडकरांना सध्या दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन होत आहे. निगडी येथे पहिल्यांदाच नारिंगी कस्तूर हा पक्षी दिसला तर क्वचितच आढळणारे प्राच्य शिंगळा घुबड या दुर्मिळ पक्ष्यांचे आठवडाभरात दर्शन झाले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींबरोबरच शहरवासियांनाही हे पक्षी पाहण्याची चांगली पर्वणी मिळत आहे.
निगडी परिसरात गालावर काळे पांढरे पट्टे, नारंगी पिसारा, गडद करडे पंख व काळी शेपटी असलेल्या नारिंगी कस्तूर या दुर्मिळ पक्ष्याची प्रथमच नोंद झाली. हा पक्षी निगडी परिसरातील दहावीत शिकणाऱ्या वेद काळे व तिसरीत शिकणाऱ्या मीरा या भावंडांना दिसला. त्यांनी त्याचे प्राण वाचविले. काळे यांच्या घराच्या खिडकीत जखमी अवस्थेत हा पक्षी बसलेला होता.
त्याने अलाइव्ह संस्थेचे अध्यक्ष व पक्षी अभ्यासक उमेश वाघेला यांच्याशी संपर्क साधून जखमी पक्ष्याबद्दल सांगितले. वाघेला यांनी त्यांना प्रथमोपचार देण्यासाठी काही सूचना दिल्या. त्यानंतर वाघेला यांनी त्याचे निरीक्षण केले असता त्याचा डावा डोळा थोडा सूजलेला होता. त्याला प्रथमोपचार दिल्यावर सुमारे दोन तास एकाच ठिकाणी आराम केल्यानंतर तो उडून जवळच आंब्याच्या फांदीवर जाऊन बसला. तासाभरात तो तेथूनही उडून गेला.
वाघेला म्हणाले, “”या पक्ष्याच्या गालावर काळे पांढरे पट्टे, नारंगी पिसारा, गडद करडे पंख असल्यामुळे व काळी शेपटी असल्यामुळे दाट झाडीत तसेच जमिनीवर पडलेल्या पालापचोळात लवकर दिसून येत नाही. हा निवासी पक्षी असून दाट झाडीच्या अधिवासात पालापाचोळाखालील कीटक, गांडूळ टिपताना दिसतात. याला इंग्रजीत “ऑरेंज हेडेड थ्रस’ तर मराठीत “नारिंगी कस्तूर’ म्हणतात. पुण्यात काही मोजक्या ठिकाणी दाट झाडी असलेल्या ठिकाणी एकटा दिसला आहे. काळे यांच्या घराच्या परिसरात दाट झाडी असून निगडीत प्रथमच दिसलेल्या “नारिंगी कस्तूर’ची पिंपरी-चिंचवड परिसरातील पक्षी यादीतील ही पहिलीच नोंद आहे.”
चऱ्होलीत आढळले दुर्मीळ घुबड
पंढरीनाथ पठारे, चंदन पठारे यांना फोटोग्राफीची आवड असून त्यांना त्यांच्या शेतात दुर्मिळ घुबड आढळले आहे. त्यांनी या घुबडाची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपली. या घुबडाला इंग्रजीत “ओरिएंटल स्कोप्स आऊल’ असे म्हणतात. तर मराठीत प्राच्य शिंगळा घुबड असे प्रमाण नाव आहे. हा पक्षी या पूर्वी दापोडी-सीएमई, दिघी, बोपखेल परिसरात आढळल्याची नोंद आहे. हा दाट झाडींमध्ये राहतो. हा भारतीय निवासी पक्षी असून तो निशाचर आहे. उंदीर, पाल याचे खाद्य असून तो बेडकासारखा आवजही काढतो.