मुंबई – सांताक्रूझ येथील हॉटेलमध्ये एका रेव्ह पार्टीत छापा घालताना एका अभिनेत्रीला आणि तिच्या मित्रांना दोन जणांनी ते एनसीबी अधिकारी असल्याचे सांगून पकडले होते. तसेच त्यांनी अभिनेत्रीकडून 20 लाख रुपयांची मागणी केली होती.
त्यानंतर या दोघांच्या त्रासाला कंटाळून जोगेश्वरीत राहणाऱ्या या भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, संबंधित अभिनेत्रीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. तोतया अधिकाऱ्यांनी दिलेल्या धमकीमुळे असह्य झालेल्या ताणातून तिने हे पाउल उचलल्याचे तिच्या मैत्रीणीने सांगितले.
याप्रकरणी आंबोली पोलिसांनी स्वत:हून दखल घेत एफआयआर दाखल केला आहे. ती अभिनेत्री अलीकडेच एका हॉटेलमध्ये तीन मित्रांसह एका पार्टीत गेली होती. तिथे दोन जण एनसीबी अधिकारी म्हणून तिच्याकडे गेले आणि तुला ड्रग्ज घेतल्याबद्दल अटक केली जाईल, असे सांगितले.
मृत अभिनेत्री आणि तिचे मित्र घाबरले आणि त्यांनी त्यांना यातून सोडवण्याची विनंती केली होती.