Cricket Australia Central Contracts :- ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या भारतात होणाऱ्या आयपीएलमध्ये आपापल्या संघांसाठी खेळत आहेत. या स्पर्धेनंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने केंद्रीय करारांची यादी जाहीर केली. या यादीत अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, अष्टपैलू एश्टन अगर आणि मार्कस स्टोनिस या खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. यासोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन वार्षिक केंद्रीय करारात 4 नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाज वॉर्नरने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वॉर्नरला करारातून बाहेर काढणे अपेक्षेप्रमाणे होते. मात्र, स्टोनिसला वगळणे हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा आश्चर्यकारक निर्णय आहे. स्टोनिस आयपीएलमध्येही भाग घेत आहे आणि लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळतो. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौऱ्याला मुकला असला तरी तो टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या रणनीतीचा एक भाग असल्याचा मानला जात होता.
वेगवान गोलंदाज जेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस या खेळाडूंचा प्रथमच करारात समावेश करण्यात आला आहे. बार्टलेट आणि एलिस व्यतिरिक्त, मॅट शॉर्ट आणि अष्टपैलू एरॉन हार्डी यांचाही या वर्षी केंद्रीय करारामध्ये समावेश करण्यात आला आहे. या चार खेळाडूंनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. शॉर्ट आणि हार्डीने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पण केले होते, तर एलिस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला होता.
ऑस्ट्रेलियाचे करारबद्ध खेळाडू – शॉन एबॉट, जेवियर बार्टलेट, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, टॉड मर्फी, झाय रिचर्डसन, मॅट स्कॉट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि एडम झाम्पा.