जमैका – पाकिस्तानचा दौरा सरू होण्यापूर्वी निवड समितीचे सदस्य व माजी कसोटीपटू रामनरेश सरवान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ, खेळाडू व निवड समिती यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सरवान यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्याचे सांगितले असले तरीही गेल्या तीन वर्षांपासून मंडळ, समिती व खेळाडू यांच्यात सातत्याने वाद होत होते. काही महिन्यांपूर्वी विंडीजच्या प्रमुख खेळाडूंनी मंडळाविरुद्ध बंड करताना भारताच्या दौऱ्यावरून मायदेशी परतण्याचा इशारा दिला होता.
आता सरवानच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा मंडळात काही अलबेल नसल्याचे समोर येत आहे. सरवान यांची मुदत 2024 सालापर्यंत होती. मात्र, त्यांनी यापूर्वीच आपले पद सोडले आहे. वेस्ट इंडीजचे माजी लेगस्पिन गोलंदाज रॉबर्ट हेन्स यांना या पदावर हंगामी नियुक्त केले आहे.